बार्शी तालुक्यात संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याची पूर्वतयारी; उद्या शेंद्री येथे आढावा बैठक!
बार्शीप्रतिनिधी दि. १४:आषाढी वारी २०२६ च्या अनुषंगाने संत मुक्ताबाई यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. या पालखी सोहळ्याचा बार्शी तालुक्यातील मौजे शेंद्री येथे रविवार, दिनांक १९ जुलै २०२६ रोजी मुक्काम असणार आहे. या मुक्कामाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय स्तरावर जय्यत तयारी सुरू असून, उद्या बुधवार, दिनांक १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता मौजे शेंद्री येथे एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मा. उपविभागीय अधिकारी, सोलापूर क्र. १ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला बार्शी तालुक्यातील विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश बार्शीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी दिले आहेत.
या प्रमुख अधिकाऱ्यांना दिले आदेश:या आढावा बैठकीसाठी गट विकास अधिकारी (BDO), सहाय्यक पोलीस निरीक्षक (तालुका पोलीस ठाणे), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), तालुका आरोग्य अधिकारी, महावितरण, अग्निशामक दल, पुरवठा निरीक्षक आणि इतर संबंधित विभागांच्या प्रमुखांना पाचारण करण्यात आले आहे.
कृती आराखड्यासह स्वतः उपस्थित राहण्याचे निर्देश:
यापूर्वी दिनांक ८ जुलै २०२६ रोजी झालेल्या पूर्वतयारी बैठकीत प्रशासनाकडून विविध विभागांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. उद्या होणाऱ्या बैठकीत सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाच्या कामाचा ‘कार्यपूर्ती अहवाल’ (Action Taken Report) आणि ठोस ‘कृती आराखडा’ (Action Plan) घेऊन स्वतः उपस्थित राहावे, आपल्या ऐवजी कोणत्याही प्रतिनिधीला पाठवू नये, असे कडक निर्देश तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. पालखी सोहळा शांततेत आणि भाविकांना कोणत्याही अडचणींविना पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज होत आहे.