Uncategorized

पिंपरी-चिंचवड महापालिकेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा विसर.

केंद्राचे राजपत्र असतानाही प्रशासनाची अनास्था!

​३ लाख मराठवाडावासीय शहरात असूनही महापालिकेचे दुर्लक्ष; मराठवाडा जनविकास संघाचे अरुण पवार यांचा प्रशासनावर थेट प्रहार

पिंपरी प्रतिनिधी दि.२१ : १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तब्बल १३ महिने निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढा देणाऱ्या मराठवाड्याच्या शौर्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला सोयीस्कर विसर पडल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारने १७ सप्टेंबर हा दिवस अधिकृत राजपत्राद्वारे ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून देशभरात साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असतानाही, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि स्थानिक राजकीय नेतृत्वाने या दिवसाकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. “महापालिकेला इतर कार्यक्रमांचे सोयरसुतक असते, मग देशाच्या एकात्मतेसाठी रक्त सांडणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणाचा एवढा विसर का?” असा रोकडा सवाल मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी उपस्थित केला आहे.​

ठळक मुद्दे व प्रमुख मागण्या

​केंद्राच्या राजपत्रालाही केराची टोपली : भारत सरकारने १२ मार्च २०२४ रोजी अधिकृत राजपत्र जारी करून १७ सप्टेंबरचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. केंद्राने या बलिदानाची दखल घेतली असताना महापालिकेने साध्या अभिवादनाचा कार्यक्रमही आयोजित न करणे ही प्रशासनाची घोर अनास्था आहे.​शहरातील ३ लाख नागरिकांच्या भावनांशी प्रतारणा : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये मराठवाड्यातील सुमारे ३ लाखांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. शहराच्या विकासात मोठा वाटा असणाऱ्या या समाजघटकाच्या अस्मितेची प्रशासनाने साधी दखलही घेतलेली नाही.​राजकीय चौकटीपलीकडे पाहण्याची गरज : हा दिवस कोणत्याही एका प्रदेशाचा वा पक्षाचा नसून अखंड भारताच्या निर्मितीचा ऐतिहासिक टप्पा आहे. याकडे राजकीय चष्म्यातून न बघता राष्ट्रीय एकात्मतेचा दिवस म्हणून महापालिकेने शासकीय पातळीवर साजरा करायला हवा.​नव्या पिढीपर्यंत इतिहास पोहचवा : केवळ औपचारिकता न करता शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, निबंध स्पर्धा, इतिहास प्रदर्शन, चित्रफिती दाखवणे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान यांसारखे उपक्रम राबवून या क्रांतीपर्वाची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावी.​

“महापालिकेच्या दालनात वर्षभर अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. मग भारताच्या स्वातंत्र्यातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय असलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्मरणासाठी एक दिवस देणे प्रशासनाला इतके जड का जावे? हुतात्म्यांच्या बलिदानाची जाणीव ठेवणे आणि इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्या वीरांना खरी आदरांजली ठरेल.”— अरुण पवार, संस्थापक अध्यक्ष, मराठवाडा जनविकास संघ, पिंपरी-चिंचवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button