“तुझ्या बापाचा रस्ता आहे काय?”……
म्हणत पिंपळे गुरवमध्ये तरुणावर चाकूने वार; दोघे अटकेत!
पिंपळे गुरव (एचआर न्यूज मराठी प्रतिनिधी) दि. ३ : रस्त्यात उभे राहण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून पिंपळे गुरव परिसरात गुंडांनी उच्छाद मांडला आहे. “बाजूला हो, कामाला जायचे आहे” असे गल्लीतल्या तरुणाने म्हणताच, “तुझ्या बापाचा रस्ता आहे काय?” असा अरेरावीचा सवाल करत गुंडांनी तरुणाच्या गळ्यावर आणि खांद्यावर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला! या खळबळजनक घटनेमुळे सांगवी परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेमका थरार कसा घडला? वैदुवस्ती (पिंपळे गुरव) येथील रहिवासी राम बंडू आरडे (वय १८) हा तरुण आपल्या दुचाकीवरून कामासाठी जात होता. गुरव तालमीजवळ आरोपी रस्त्यात अडथळा बनून उभा होता. रामने त्याला “बाजूला हो, मला कामाला जायचे आहे” असे विनंतीपूर्वक सांगितले.परंतु, डोक्यात हवा गेलेल्या आरोपीला या साध्या शब्दांचा इतका राग आला की, त्याने थेट शिवीगाळ करत वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर पाहाता पाहाता हिंसेत झाले. आरोपीने खिशातून धारदार चाकू काढून थेट रामच्या गळ्याखाली आणि डाव्या खांद्यावर सपासप वार केले!रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रामला वाचवण्यासाठी कोणी पुढे येऊ नये म्हणून आरोपीच्या इतर साथीदारांनी कमरेला खोचलेला कोयता हवेत उगारून परिसरात दहशत माजवली आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
पोलीस ॲक्शन मोडवर; दोघे जेरबंद!घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून तपास सुरू केला आहे.अटक आरोपी: १. ऋषी माने२. प्रणव इरकल (दोघे रा. पिंपळे गुरव)फरार आरोपी: आदित्य शिंदे आणि नागेश चव्हाण (पोलीस यांच्या मागावर आहेत).
गुन्ह्याची नोंद: सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. ३९०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) सह भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.तपासी अंमलदार: सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटीलया प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.