Uncategorized

पिंपळे गुरव स्मशानभूमीत अपघाताचा धोका…..

रॅम्पऐवजी पायऱ्या करण्याची अरुण पवार यांची मागणी

महापालिका आयुक्तांना दिले निवेदन; सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी स्वीकारले पत्र

​पिंपळे गुरव प्रतिनिधी दि. ६ : पिंपळे गुरव (प्रभाग क्र. २९) येथील नूतनीकरण केलेल्या स्मशानभूमीत खांदे बदलीच्या ठिकाणी असलेल्या रॅम्पच्या चुकीच्या रचनेमुळे पावसाळ्यात व इतर वेळीही नागरिकांचा पाय घसरून अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थापत्य विभागाने येथील रॅम्प काढून तात्काळ रुंद पायऱ्या कराव्यात, अशी ठाम मागणी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार विजेते अरुण पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे केली आहे.​

या संदर्भातील निवेदन महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी स्वीकारले. यावेळी किशोर अटरगेकर उपस्थित होते.​

नागरिकांच्या सुरक्षेचा आणि सुविधांचा प्रश्न ​अरुण पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे की, महापालिकेने स्मशानभूमीचे नूतनीकरण केले खरे, मात्र नियोजनातील त्रुटींमुळे नागरिकांचा त्रास वाढला आहे. स्मशानभूमीच्या मुख्य प्रवेशद्वाराची रुंदी सुमारे २५ फूट आहे. अंत्ययात्रा आल्यावर प्रवेशद्वाराजवळ खांदे बदली करण्यासाठी लोक थांबतात. मात्र, तिथून अंत्यविधीसाठी मृतदेह उचलून नेताना अतिशय घसरड्या रॅम्पमुळे खांदेकर आणि नागरिकांना मोठी कसरत करावी लागते.

​या समस्येवर मात करण्यासाठी पवार यांनी खालील महत्त्वाच्या सुधारणांची मागणी केली आहे:​ रॅम्प काढून रुंद पायऱ्या करा: खांदे बदलीच्या ठिकाणी घसरडा रॅम्प हटवून तात्काळ रुंद पायऱ्या (टप्पे) तयार कराव्यात, जेणेकरून पाय घसरून अपघात होणार नाहीत.​वाहनांसाठी रस्ता मोकळा करा: सध्या ज्या बाजूला अत्यंत अरुंद पायऱ्या आहेत, तेथे सुधारणा करून अंत्यविधीचे साहित्य आणणाऱ्या ॲम्बुलन्स किंवा टेम्पो वाहनांसाठी आत येण्या-जाण्याची योग्य जागा करावी.

​लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; महापालिकेने तत्काळ पाहणी करावी!​

“स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी एका वेळी सुमारे हजार ते दीड हजार नागरिक उपस्थित असतात. या गंभीर आणि संवेदनशील समस्येबाबत गेल्या १५ दिवसांपासून स्थानिक लोकप्रतिनिधींकडे सतत पाठपुरावा केला, परंतु दुर्दैवाने या जनहिताच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे महापालिकेच्या स्थापत्य विभागाने तात्काळ प्रत्यक्ष जागेची पाहणी करून प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करावी.”— अरुण पवार (राज्यस्तरीय वृक्षमित्र पुरस्कार विजेते)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button