पर्यावरण संवर्धन आणि संविधान जागर……

अरुण पवार यांच्या पुढाकाराने शाळा-महाविद्यालयांत १०५० वृक्षांचे रोपण; संविधानाच्या प्रतींचे वाटप
पुणे :प्रतिनिधी दि. १६
भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रनिष्ठेचा अनोखा संगम घडवून आणणारा उपक्रम राज्यभरात राबवण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित अरुण पवार यांच्या प्रेरणेतून आणि मराठवाडा जनविकास संघाच्या पुढाकाराने विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ६ फुटांहून अधिक उंचीच्या तब्बल १०५० रोपांचे शास्त्रोक्त वृक्षारोपण करण्यात आले. याचबरोबर शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन संविधान साक्षरतेचा जागर करण्यात आला.
कुठे किती वृक्षारोपण झाले?
- श्री लक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्था (हासेगाव शि., धाराशिव): संतोष माने यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक ५०० झाडांचे रोपण करून हरित पट्टा उभारण्याचा संकल्प.
- भैरवनाथ हायस्कूल (धारूर, धाराशिव): पर्यावरण जनजागृतीसाठी २५० झाडांची लागवड.
- श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, औंध (पुणे): ५० झाडांचे रोपण व शिक्षक-विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रतींचे वाटप.
- रामेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ (सोनपेठ, परभणी): १०० वृक्षांचे रोपण.
- अ राय ऑफ होप चॅरिटेबल ट्रस्ट (वाकड/रिहे, पुणे): अभियंता संजय कुमार यांच्या पुढाकाराने १०० वृक्षांचे रोपण व वाटप.
- वेदांत साधना वारकरी गुरुकुल (रिहे, मुळशी): ह.भ.प. निवृत्ती महाराज बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ५० झाडांचे रोपण व वृक्षदान.

देशी, औषधी व फळझाडांचा समावेश
या मोहिमेत वड, पिंपळ, कडुलिंब, उंबर, आवळा, अर्जुन, कदंब, बकुळ यांसारख्या देशी आणि औषधी वनस्पतींसह विविध शोभिवंत फुले आणि फळझाडांची लागवड करण्यात आली. झाडे केवळ न लावता ती १०० टक्के जगवण्याचा निर्धार सर्व संस्थांनी केला.
या उपक्रमास पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, महेश आगम, कॅप्टन युवराज माने, ह.भ.प. शेखर महाराज जांभूळकर, सरपंच धनाजी बोडके, कैलास गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

”पर्यावरण संवर्धन आणि संविधान साक्षरता हीच खरी राष्ट्रनिष्ठा आहे. निसर्गाचे रक्षण करणे आणि भावी पिढीत राष्ट्रीय एकात्मता रुजवण्यासाठी संविधानाची प्रत देणे हा दुहेरी आनंद देणारा उपक्रम आहे. ही सर्व झाडे स्थानिक संस्थांच्या मदतीने १००% जगवली जातील.”
— अरुण पवार (संस्थापक-अध्यक्ष, मराठवाडा जनविकास संघ)