Uncategorized

हिप्परगा रवा येथे वीज बिलांचा भोंगळ कारभार; नागरिकांचा संताप

हिप्परगा रवा, प्रतिनिधी दि. २४ : हिप्परगा रवा येथील नागरिकांना दर महिन्याला वेळेवर वीज बिल मिळत नसल्याने नागरिकांना बिल भरण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असल्याची तक्रार समोर आली आहे. वेळेवर बिल हातात न मिळाल्यामुळे अनेक नागरिकांना बिलाची रक्कम, अंतिम तारीख आणि थकीत रकमेची माहिती मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वेळेवर वीज बिल न मिळाल्यानंतर बिलाची रक्कम थकीत राहते आणि त्यानंतर वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. त्यामुळे नियमितपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, काही ठिकाणी वीज बिल नागरिकांच्या घरापर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याऐवजी रस्त्याच्या कडेला टाकून लाईनमन निघून जात असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे. त्यामुळे बिल हरवण्याची किंवा वेळेत नागरिकांच्या हाती न पडण्याची शक्यता निर्माण होत आहे.

या प्रकारामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) लोहारा विभागाच्या कामकाजावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांना वेळेवर वीज बिल उपलब्ध करून देणे, बिल वितरणाची योग्य व्यवस्था करणे आणि वीज खंडित करण्यापूर्वी ग्राहकांना आवश्यक सूचना देणे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या संपूर्ण प्रकाराची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन चौकशी करावी आणि वीज बिल वितरण व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी मागणी हिप्परगा रवा येथील नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button