गणेश विसर्जनानंतर अवघ्या चार दिवसांत ६५०० मेट्रिक टन कचरा साफ.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘स्वच्छता योद्ध्यां’ची कौतुकास्पद कामगिरी!
• २९४ मेट्रिक टन निर्माल्य स्वतंत्र संकलित; विसर्जन घाटांवर कचऱ्याचा ढीग होऊ न देता यंत्रणा राहिली सज्ज.
•तीन हजार सफाई सेवकांचा अहोरात्र खडा पहारा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून कर्मचाऱ्यांसह नागरिकांचे आभार.
पिंपरी (विशेष प्रतिनिधी) दि. २७ : लाडक्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने मैदानावर उतरून दाखवलेली तत्परता अत्यंत प्रभावी ठरली आहे. गणेश विसर्जनाच्या काळात शहरातील विसर्जन घाट आणि प्रमुख मिरवणूक मार्गांवरून २२ ते २५ सप्टेंबर या अवघ्या चार दिवसांत तब्बल ६ हजार ५०० मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. तब्बल तीन हजारांहून अधिक सफाई कर्मचाऱ्यांनी अहोरात्र राबून शहर चकाचक ठेवण्याची मोठी जबाबदारी फत्ते केली.
घाटांवर चोख विलगीकरण: २९४ मेट्रिक टन निर्माल्य गोळा विसर्जनाच्या गर्दीत पूजेचे साहित्य आणि फुलांचा कचरा इतर कचऱ्यात मिसळू नये, यासाठी आरोग्य विभागाने काटेकोर नियोजन केले होते. गणेशमूर्तींना वाहण्यात आलेली फुले, दुर्वा, हार आणि पूजा साहित्यापासून तब्बल २९४.६५५ मेट्रिक टन निर्माल्य स्वतंत्र संकलित करण्यात आले. घाटांवर ठेवलेल्या स्वतंत्र कलशांमुळे निर्माल्य विलगीकरणाची प्रक्रिया विनाव्यत्यय पार पडली.

मिरवणूक संपताच रस्त्यांची सफाई विसर्जनाच्या दिवशी लाखो भाविकांची गर्दी असतानाही स्वच्छता पथके अविरत कार्यरत होती. मिरवणूक मार्ग पुढे सरकल्यानंतर मागे कचऱ्याचे ढीग राहू नयेत, यासाठी तत्काळ झाडलोट आणि संकलन यंत्रणा धावून गेली. विसर्जन पूर्ण होताच सर्व घाट परिसर युद्धपातळीवर स्वच्छ करण्यात आले.
“शहराची स्वच्छता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी”
“गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या काळात शहराची स्वच्छता सुरळीत ठेवण्यासाठी आमची पथके सातत्याने मैदानात होती. नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले. नागरिकांनीही यापुढे कचरा रस्त्यावर किंवा उघड्यावर न टाकता योग्य विलगीकरण करून महापालिकेच्या घंटागाड्यांमध्येच द्यावा.”— डॉ. प्रदीप ठेंगल, उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
”नागरिक आणि महापालिका समन्वयाचे उत्तम उदाहरण”
“गणेश विसर्जनाच्या काळात नागरिकांनी दाखवलेली जागरूकता आणि दिलेले सहकार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. भाविकांनी निर्माल्य स्वतंत्रपणे जमा केल्याने घाट परिसर स्वच्छ ठेवण्यास मोठी मदत झाली. त्याचबरोबर प्रचंड प्रमाणात निर्माण झालेला कचरा तातडीने संकलित करणाऱ्या सर्व सफाई कामगार व आरोग्य विभागाच्या पथकांचे काम निश्चितच कौतुकास पात्र आहे.”— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका