चिंचवडमध्ये माथाडींचा महामेळावा! १४ जिल्ह्यांतून ६ हजार पदाधिकारी धडकणार.

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभा’त ऑन-द-स्पॉट नोकऱ्यांची लयलूट
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी दि. २७ : भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या (रजि.) वतीने मंगळवारी (२९ सप्टेंबर) चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये भव्य राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा रंगणार आहे. या मेळाव्यात राज्यातील तब्बल १४ जिल्ह्यांमधून ६ हजारांपेक्षा जास्त माथाडी पदाधिकारी एकत्र येणार असून, कामगारांच्या हक्कांचा एल्गार पुकारला जाणार आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांनी काळेवाडी येथील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या ऐतिहासिक मेळाव्याचे उद्घाटन मंगळवारी दुपारी २ वाजता मा. श्री. रवींद्र दादा चव्हाण यांच्या हस्ते पार पडणार आहे.
२०३० पर्यंत ३० हजार पदाधिकारी जोडण्याचा निर्धार!
माथाडी कामगारांचा रोजगार, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा आणि सर्वांगीण कल्याण या प्रमुख मुद्द्यांवर या मेळाव्यात मंथन होणार आहे. आगामी काळात कामगारांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी आक्रमक कार्यपद्धती आखली जाणार असून, २०३० पर्यंत तब्बल ३० हजार नवीन पदाधिकाऱ्यांना संघटनेत सक्रिय करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
सुशिक्षित बेरोजगारांसाठी ‘रोजगार महाकुंभ’ आणि ‘जॉब कार्ड’केवळ कामगार हक्कच नव्हे, तर सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांना स्वावलंबी करण्यासाठी याच ठिकाणी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ भरवला जाणार आहे.
पाचवी पास ते उच्चशिक्षितांना संधी : पिंपरी-चिंचवड परिसरातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी थेट हजर राहून शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना ऑन-द-स्पॉट जॉब ऑफर देतील.
कोणीही रिकाम्या हाताने परतणार नाही : ज्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती मिळणार नाही, त्यांच्यासाठी विशेष ‘जॉब कार्ड’ उपक्रम राबवून पुढील टप्प्यात रोजगाराची हमी दिली जाणार आहे.
कामगारांचे संघटन आणि तरुणांच्या हाताला काम देणारा हा मेळावा कामगार विश्वात नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास अनुप मोरे यांनी व्यक्त केला आहे.