Uncategorized

थेरगाव येथे ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ उत्साहात संपन्न.

१,५०० हून अधिक सफाई सेवकांची मोफत आरोग्य तपासणी

पिंपरी चिंचवड महापालिकेचा उपक्रम: सेवकांच्या पाल्यांसाठी कौशल्यविकास व रोजगाराच्या संधींचेही मार्गदर्शन

३० सप्टेंबर रोजी पुढील ५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी शिबिर

पिंपरी (विशेष प्रतिनिधी) दि. २८ : शहराच्या स्वच्छतेचा भार खांद्यावर वाहणाऱ्या सफाई मित्रांच्या आरोग्याची काळजी आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अंतर्गत थेरगाव येथे ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ यशस्वीरीत्या पार पडले. येथील कै. शंकरराव गावडे कामगार भवन येथे आयोजित या शिबिरामध्ये ‘अ’, ‘ब’, ‘ड’, ‘ग’ आणि ‘ज’ या पाच क्षेत्रीय कार्यालयांतील १,५०० हून अधिक सफाई सेवकांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी करून घेतली.​

शिबिराचे उद्घाटन ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, सुधीर वाघमारे, अंकुश झिटे, अतुल सोनवणे, राजू साबळे, शांताराम माने, डॉ. संजय सोनेकर आणि डॉ. शंकर मोसलगी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.​

आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिरादरम्यान सफाई सेवकांची हिमोग्लोबिन, रक्तदाब, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची मोफत तपासणी करण्यात आली. दैनंदिन धावपळीत शरीराकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून तज्ज्ञांनी संतुलित आहार, योगासने, प्राणायाम, मानसिक ताणतणाव व्यवस्थापन आणि कामाच्या वेळी घ्यावयाची सुरक्षा यावर मोलाचे मार्गदर्शन केले.​

आरोग्यविषयक समस्या प्राथमिक अवस्थेतच लक्षात आल्यास त्यावर वेळेत उपचार शक्य होतात, त्यामुळे नियमित तपासणी आणि आहाराकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे डॉ. लक्ष्मण गोफणे व उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी स्पष्ट केले.

​पाल्यांसाठी कौशल्य विकासाचे दालनया शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे सफाई सेवकांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील १८ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींना स्वावलंबी बनवण्यासाठी समाजविकास विभागाच्या ‘लाईट हाऊस कौशल्य’तर्फे विशेष माहिती केंद्र उभारण्यात आले होते. वैशाली खरात यांनी लेखा सहाय्यक, ई-व्हायकल तंत्रज्ञ, विद्युत उपकरण दुरुस्ती, हॉटेल मॅनेजमेंट, मोबाईल व दुचाकी दुरुस्ती, डिजिटल मार्केटिंग, रिटेल मॅनेजमेंट यांसारख्या विविध मोफत अभ्यासक्रमांची आणि त्यातून मिळणाऱ्या रोजगाराच्या संधींची सविस्तर माहिती दिली.​

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आरोग्याधिकारी अतुल सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुधीर वाघमारे यांनी मानले.​

३० सप्टेंबरला पुढील टप्पा‘ स्वच्छतेत सहभाग- स्वच्छ भारत, विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित सेवा संकल्प अभियानांतर्गत पुढील शिबिर बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये ‘क’, ‘इ’, ‘फ’, ‘ह’ आणि ‘ल’ या उर्वरित पाच क्षेत्रीय कार्यालयांतील सफाई मित्रांची तपासणी केली जाईल.

​”सफाई सेवक शहर स्वच्छ ठेवण्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करतात. त्यांची नियमित काळजी घेणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. सफाई सेवकांचे आरोग्य जपणे म्हणजे संपूर्ण शहराचे आरोग्य जपणे होय.”— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका​

“बदलत्या काळानुसार सफाई मित्रांच्या कुटुंबातील युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. या प्रशिक्षणामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील.”— कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button