काळेवाडीत महिलेवर प्राणघातक हल्ला व विनयभंग.
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या प्रदेश कार्याध्यक्षावर गुन्हा दाखल
मच्छिंद्र चिंचोळे यांच्यावर गंभीर कलमांखाली एफआयआर; पिंपरी-चिंचवड शहरात तीव्र संताप
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी दि. २५ : काळेवाडी-थेरगाव परिसरात एका महिलेवर भरदिवसा हल्ला चढवून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे यांच्याविरुद्ध काळेवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भररस्त्यात महिलेवर झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भररस्त्यात गाठून मारहाण; जुन्या वादातून सूडबुद्धीने कृत्यपोलिसांत दाखल झालेल्या प्रथम खबर अहवालानुसार (FIR), शनिवार २४ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. थेरगाव येथील महापालिकेच्या रुग्णालयाजवळील एका स्नॅक्स सेंटरसमोर फिर्यादी महिला उपस्थित असताना चिंचोळे यांनी तिला अडवले. तक्रारदार महिलेचे पती आणि आरोपी मच्छिंद्र चिंचोळे हे पूर्वी एकत्र सामाजिक काम करत होते; मात्र काही काळापूर्वी त्यांच्यात मतभेद होऊन दुरावा निर्माण झाला होता. याच जुन्या वादाचा राग आणि पूर्वग्रह मनात ठेवून आरोपीने थेट महिलेला लक्ष्य केले. महिलेशी अत्यंत अपमानास्पद आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिला बेदम मारहाण करण्यात आली.
भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमांन्वये गुन्हा
पीडित महिलेने तातडीने काळेवाडी पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मच्छिंद्र चिंचोळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे:
१) कलम ७४ : महिलेच्या विनयशीलतेचा भंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे किंवा फौजदारी बळाचा वापर करणे.
२) कलम ११५(२) : स्वेच्छेने दुखापत पोहोचवणे व मारहाण करणे.
काळेवाडी पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष एका सामाजिक संघटनेच्या महत्त्वाच्या पदावर वावरणाऱ्या पदाधिकाऱ्यावर थेट महिलेचा विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. काळेवाडी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे काम हाती घेतले आहे. भरदिवसा महिलेवर हात उचलणाऱ्या आरोपीवर पोलीस कधी व काय कारवाई करतात, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.