अखिल भारतीय छावा मराठा संघटनेच्या बड्या नेत्याची भररस्त्यात मुजोरी!
प्रदेश कार्याध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळेवर महिलेचा विनयभंग व मारहाणीचा गुन्हा; पिंपरी-चिंचवड हादरले
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी दि. २५ : सामाजिक संघटनेच्या नावाखाली समाजात मिरवणाऱ्या एका बड्या पदाधिकाऱ्याचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक चेहरा समोर आला आहे. अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे यांच्याविरुद्ध भररस्त्यात महिलेशी लज्जास्पद वर्तन करून तिला बेदम मारहाण केल्याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या विकृत कृत्यामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमधून संतापाचा उद्रेक होत आहे.
भररस्त्यात गाठून बेदम मारहाण; पूर्ववैमनस्यातून महिलेवर सूड
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार २४ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. थेरगाव येथील महापालिका रुग्णालयाजवळील एका स्नॅक्स सेंटरसमोर फिर्यादी महिला उभी असताना मच्छिंद्र चिंचोळेने तिला एकटी पाहून अडवले. फिर्यादी महिलेचे पती आणि आरोपी चिंचोळे हे आधी एकत्र सामाजिक काम करत होते, मात्र काही काळापूर्वी त्यांच्यात खटके उडाले होते.
पतीवर असलेला जुना राग मनात ठेवून चिंचोळेने थेट एका निष्पाप महिलेला लक्ष्य केले. भररस्त्यात लोकांसमोर महिलेशी अत्यंत लज्जास्पद, अपमानास्पद वर्तन करत तिच्यावर हात उचलला आणि तिला बेदम मारहाण केली. या गुंडगिरीमुळे परिसरात काही काळ प्रचंड दहशत पसरली होती.
BNS च्या कठोर कलमान्वये FIR; आरोपीच्या अडचणी वाढल्याया घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ काळेवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मच्छिंद्र चिंचोळेविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या खालील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे:
१) कलम ७४: महिलेच्या विनयशीलतेचा भंग करण्याच्या हेतूने हल्ला करणे किंवा बळाचा वापर करणे.
२) कलम ११५(२): स्वेच्छेने मारहाण करून दुखापत पोहोचवणे.
पोलीस खाक्या दाखवणार की राजकीय दबाव चालणार?
सर्वांचे लक्षस्वतःला सामाजिक संघटनेचा प्रदेश कार्याध्यक्ष म्हणवून घेणाऱ्या नेत्याकडून भरदिवसा एका महिलेवर हात उचलला गेल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
महिलांच्या सुरक्षेच्या गप्पा मारणाऱ्या पदाधिकाऱ्याची ही मुजोरी ठेचण्यासाठी पोलीस त्याला तातडीने बेड्या ठोकतात की प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो, याकडे आता संपूर्ण शहराचे डोळे लागले आहेत.