Uncategorized

जंजिरा किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यावरून मनोज जरांगेंना ‘शिवभीम सेने’चा इशारा.

दोन दिवसांत भूमिका स्पष्ट न केल्यास तोंडाला काळे फासणार.

पुणे/पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी दि. २८ : जंजिरा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या मागणीवरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विषयावर दोन दिवसांत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट न केल्यास अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांच्या तोंडाला काळे फासण्याचा थेट इशारा ‘शिवभीम सेने’चे संस्थापक अध्यक्ष भरतभाऊ ओव्हाळ यांनी दिला आहे.

​अडीच वर्षांपूर्वी दिले होते निवेदन : प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भरतभाऊ ओव्हाळ यांनी सांगितले की, जंजिरा किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, या मागणीचे निवेदन अडीच वर्षांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आले होते. त्यावेळी जरांगे यांनी या मागणीला दुजोरा देत तत्कालीन मुख्यमंत्री कार्यालयातील (OSD/PA) अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता आणि पुतळा उभारणीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, इतका मोठा कालावधी उलटूनही यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.​

गंभीर आरोपांची सरबत्ती : ओव्हाळ यांनी जरांगे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत जोरदार टीका केली:​

•वेळेची उपलब्धता आणि प्राधान्यक्रम: “जरांगे पाटील विविध राजकीय व सामाजिक विषयांवर आंदोलन करण्यासाठी पुढाकार घेतात. जुन्नर आणि भीमाशंकर येथे जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असतो; मग जंजिरा किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या मागणीकडे ते दुर्लक्ष का करत आहेत?” असा सवाल त्यांनी केला.​

•आर्थिक लागेबांध्यांचा संशय: जंजिरा किल्ल्यावर पुतळा उभारण्यास विरोध व्हावा म्हणून त्यांनी कोणाकडून पैसे घेतले आहेत का, हे त्यांनी एकदा माध्यमांसमोर स्पष्ट करावे, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.​

•रिमोट कंट्रोल आणि टेंडरधार्जिणे सहकारी: “जरांगे पाटील हे स्वतःच्या मर्जीने नव्हे, तर कोणाच्या तरी दबावाखाली ‘रोबोट’सारखे काम करत आहेत. कोणीतरी सांगितल्यावर ते चालतात आणि थांबतात. त्यांच्यासोबत वावरणारे सहकारी हे केवळ टेंडरधार्जिणे असून समाजाची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे,” असे ओव्हाळ म्हणाले.​

दोन दिवसांचा ‘अल्टिमेटम’ मुंबईकडे जात असताना शिवभीम सेनेने जरांगे यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला होता, याची आठवण करून देत ओव्हाळ म्हणाले, “आम्ही चांगल्या हेतूने त्यांना साथ दिली, मात्र त्यांनी आमच्या मुख्य मागणीकडेच पाठ फिरवली. जर हा विषय त्यांच्यासाठी महत्त्वाचा नसेल, तर त्यांनी तसे जाहीर करावे. पुढील दोन दिवसांत त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी; अन्यथा अंतरवाली सराटी येथे जाऊन त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल. ही धमकी समजायची की इशारा, हे खुद्द मनोज जरांगे पाटील यांनीच ठरवावे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button