दिव्यांग कलाकारांच्या कलाविष्कारातून साकारणार ‘महाराष्ट्राची लोकधारा’

३० ऑक्टोबरला चिंचवडमध्ये रंगणार सांस्कृतिक कार्यक्रम
पिंपरी प्रतिनिधी दि. २७ : दिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलात्मक क्षमतेला प्रोत्साहन मिळावे आणि समाजात त्यांच्या कला व सांस्कृतिक योगदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली, ‘DBF कला व सांस्कृतिक मंच’ यांच्या वतीने तसेच स्नेह रिसॉर्ट आणि रॉयल टच यांच्या सहप्रायोजकत्वाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. हा सांस्कृतिक सोहळा शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० ते रात्री ८:०० या वेळेत प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप व हेतू या कार्यक्रमात दिव्यांग कलाकार महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला, संगीत आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारे विविध कलाविष्कार सादर करणार आहेत. दिव्यांग व्यक्तींमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांना सांस्कृतिक क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
मान्यवरांचे मार्गदर्शन व सहकार्य : दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
यामध्ये प्रामुख्याने: १) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. रवी लांडगे. २) स्थायी समिती अध्यक्ष श्री. अभिषेक बारणे ३) विरोधी पक्षनेते श्री. भाऊसाहेब भोईर ४) महापालिका आयुक्त मा. डॉ. विजय सूर्यवंशी (IAS) ५) अतिरिक्त आयुक्त-३ श्री. विक्रांत बागडे ६) समाज विकास विभागाच्या उपायुक्त श्रीमती ममता शिंदे ७) दिव्यांग कक्षाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती निवेदिता घार्गे ८)दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ओमप्रकाश देशमुख (IAS Retd.) ९) दिव्यांग भवन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक श्री. अजय चारठाणकर.
तसेच या कार्यक्रमासाठी सहप्रायोजक म्हणून स्नेह रिसॉर्टचे संस्थापक श्री. अमोल चौधरी आणि रॉयल टचचे संस्थापक श्री. दीपक माने यांचेही महत्त्वाचे सहकार्य लाभले आहे. सर्व मान्यवरांच्या सहकार्याने दिव्यांग व्यक्तींना समान संधी, सन्मान आणि स्वावलंबनाच्या दिशेने पोषक वातावरण निर्माण करण्याचा दिव्यांग भवन फाउंडेशनचा हा प्रयत्न आहे.