पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; १५६ गुन्ह्यांतील २ कोटी ६४ लाखांचे अंमली पदार्थ भट्टीमध्ये जाळून खाक!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी दि. ३ : अंमली पदार्थ तस्करांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने मोठी मोहीम उघडली असून, न्यायालयाच्या व शासनाच्या नियमांनुसार जप्त करण्यात आलेल्या तब्बल २ कोटी ६४ लाख १३ हजार ७१० रुपये किमतीच्या ड्रग्जचा जाहीरपणे नाश करण्यात आला आहे. यामध्ये ३१५ किलो गांजा, ७६१ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) यांसह विविध अंमली पदार्थांचा समावेश आहे. रांजणगाव एमआयडीसी येथील भट्टीत हे सर्व अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले.
पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांनी आयुक्तालय हद्दीतील एन.डी.पी.एस. (NDPS) गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.
‘अंमली पदार्थ नाश समिती’च्या देखरेखीखाली कारवाई
भारत सरकारचे राजपत्र, महाराष्ट्र शासनाचा गृह विभाग, अप्पर पोलीस महासंचालक (गुन्हे अन्वेषण विभाग) आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (अँटी नारकोटिक्स टास्क फोर्स, मुंबई) यांच्या मार्गदर्शक सूचना व परिपत्रकानुसार पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत एक विशेष समिती गठित करण्यात आली होती.
यामध्ये:अध्यक्ष: मा. सारंग आवाड (अप्पर पोलीस आयुक्त)सदस्य: मा. रोहिदास पवार (पोलीस उप-आयुक्त, गुन्हे)सदस्य: श्री. संदीप आटोळे (पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ १)
रांजणगाव एम.आय.डी.सी. येथे अंमली पदार्थ खाक
३० जून २०२६ रोजी या गठित समितीच्या थेट देखरेखीखाली आणि प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा (पुणे), राज्य उत्पादन शुल्क (पुणे) तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (पुणे) यांच्या प्रतिनिधींच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. रांजणगाव एम.आय.डी.सी. येथील Maharashtra Enviro Power ltd (Plot no. P-56, Tal. Shirur) येथील भट्टीमध्ये एकूण १५६ गुन्ह्यांशी संबंधित मुद्देमाल जाळण्यात आला.
नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा तपशील:
गांजा: ३१५ किलो ग्रॅमएम.डी. (MD): ७६१ ग्रॅमअफूची झाडे: १२ किलोब्राउन शुगर: ३०० ग्रॅमडुडा: १०९ किलोएकूण किंमत: ₹ २,६४,१३,७१०/- (२ कोटी ६४ लाख १३ हजार ७१० रुपये)
या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कामगिरी
सदरची धडक कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ १) संदीप आटोळे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे ०२) प्रविण बा. मोरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे योगदान:
हा साठा नष्ट करण्याच्या प्रक्रियेत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल चव्हाण, सहा. पोलीस उपनिरीक्षक शकुर तांबोळी, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर मुळे, शिल्पा कांबळे, निखिल शेटे तसेच पोलीस शिपाई संतोष स्वामी, रणधीर माने, कपिलेश इगवे, चंद्राकांत जाधव, संतोष सपकाळ आणि गोविंद डोके यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
पिंपरी-चिंचवड पोलिसांचा इशारा: “शहरातून अंमली पदार्थांचे जाळे समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस कटिबद्ध असून, ड्रग्ज तस्करांवर यापुढेही अशीच कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील.”